Home क्राईम मुक्ताईनगर महावितरणवर गंभीर आरोप ; नियमांना बगल देत विद्युत कामे, लाखोंच्या व्यवहाराची...

मुक्ताईनगर महावितरणवर गंभीर आरोप ; नियमांना बगल देत विद्युत कामे, लाखोंच्या व्यवहाराची चर्चा


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, हरताळे शिवारातील विद्युत वाहिनी शिफ्टिंगचे काम कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पूर्ण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या नियमानुसार अशा प्रकारच्या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करणे, उपविभागीय व विभागीय स्तरावर मंजुरी घेणे तसेच मंडळ कार्यालयाकडून अधिकृत आदेश प्राप्त करणे आवश्यक असते. मात्र, या सर्व प्रक्रियांना पूर्णतः बगल देत संबंधित ठेकेदाराने काही अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताने हे काम सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच पूर्ण केल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात प्रभारी कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचे संबंधित ठेकेदाराशी आर्थिक संबंध असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगू लागली आहे. या चर्चेमुळे महावितरण प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नियमबाह्य पद्धतीने कामे पूर्ण होणे आणि त्यामागे आर्थिक व्यवहार असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.

दरम्यान, यापूर्वीही 2023 साली शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत तारा चोरी झाल्यानंतर संबंधितांना न्याय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने योग्य दखल घेतली नव्हती. एका शेतकऱ्याला तब्बल तीन वर्षे वीज जोडणीपासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र, ही बाब माध्यमांमध्ये झळकताच अवघ्या 24 तासांत काम पूर्ण करण्यात आले होते, यावरून प्रशासनाच्या हलगर्जी आणि पक्षपाती कारभाराचा प्रत्यय आला होता.

सामान्य शेतकऱ्यांना किरकोळ कामांसाठीही कार्यालयीन पातळीवर त्रास सहन करावा लागतो, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहारांच्या आधारावर नियमबाह्य कामे झटपट पूर्ण केली जातात, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या सर्व प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.


Protected Content

Play sound