Home क्राईम मैत्रीचा फायदा घेत तरुणीचा विनयभंग ; इन्स्टाग्रामवरून बदनामी करणाऱ्या विकृतावर गुन्हा !

मैत्रीचा फायदा घेत तरुणीचा विनयभंग ; इन्स्टाग्रामवरून बदनामी करणाऱ्या विकृतावर गुन्हा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणाने तरुणीचा विनयभंग केल्याची आणि तिचे बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करून तिची बदनामी केल्याची धक्कादायक घटना जळगावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात राहणारी पीडित २२ वर्षीय तरुणीची लातूर येथील रोहित आनंदा राठोड याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. १० सप्टेंबर २०२४ रोजी आरोपी रोहित याने पीडितेशी असलेल्या मैत्रीचा फायदा घेत तिला जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील एका हॉटेलवर बोलावून घेतले. तेथे त्याने पीडितेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, पीडितेने याला स्पष्ट नकार दिला.

नकार मिळाल्याने संतापलेल्या रोहितने पीडितेच्या संमतीशिवाय तिला स्पर्श करत तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, त्याने पीडितेसोबतचे काही फोटो चोरून काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पीडितेच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

पीडितेने त्याला प्रतिसाद देणे बंद केल्यावर आरोपीने तिच्या नावाने आणि इतर विविध नावांनी अनेक बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट्स तयार केले. या अकाऊंट्सवर त्याने स्वतःचे आणि पीडितेचे फोटो पोस्ट करून तिची बदनामी केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी रोहित आनंदा राठोड (रा. उजनी, ता. औसा, जि. लातूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. शंकर मोटेकर हे करत आहेत.


Protected Content

Play sound