Home राष्ट्रीय भारतात दहशतवादीच्या घटनांमध्ये घट; पाकिस्तान सर्वात जास्त दहशतवादने प्रभावित देश

भारतात दहशतवादीच्या घटनांमध्ये घट; पाकिस्तान सर्वात जास्त दहशतवादने प्रभावित देश


मुंबई-वृत्तसेवा | भारतात गेल्या एका वर्षात दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 च्या अहवालानुसार देशातील दहशतवादी घटनांमध्ये 43% नी घट झाली असून भारत आता 13व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षी भारत 11व्या स्थानावर होता.

अहवालानुसार, दक्षिण आशिया सलग दहाव्या वर्षी दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित क्षेत्र ठरले आहे. यंदा पहिल्यांदाच पाकिस्तान या यादीत अव्वल स्थानी असून तो सर्वाधिक प्रभावित देश बनला आहे. तर अफगाणिस्तानमधील परिस्थितीत सुधारणा होऊन तो शीर्ष 10 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे.

जागतिक पातळीवरही दहशतवादाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. 2025 मध्ये दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 28% घट झाली असून दहशतवादी हल्ल्यांची संख्या 22% नी कमी होऊन 2,944 वर आली आहे. एकूण 81 देशांमध्ये परिस्थिती सुधारली, तर 19 देशांमध्ये ती बिघडली आहे.

मात्र, पश्चिम देशांमध्ये परिस्थिती उलट दिसून आली आहे. तेथे दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये तब्बल 280% वाढ नोंदवली गेली आहे. युरोपियन युनियनच्या अहवालानुसार 2024 मध्ये 14 देशांमध्ये 58 दहशतवादी हल्ले झाले. यामध्ये फ्रान्समध्ये 14 आणि जर्मनीमध्ये 6 हल्ल्यांची नोंद झाली. तसेच 20 देशांमध्ये 449 संशयितांना अटक करण्यात आली. ब्रिटनमध्येही 3,000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अहवालात दहशतवादी संघटनांकडून युवकांना कट्टरपंथी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या पद्धतींचाही उल्लेख करण्यात आला आहे. सोशल मीडिया, गेमिंग प्लॅटफॉर्म आणि एन्क्रिप्टेड चॅटच्या माध्यमातून तरुणांना लक्ष्य केले जात आहे. हिंसक घटनांचे मीम्स, ‘गेमिफिकेशन’ आणि ‘फनेल स्ट्रॅटेजी’च्या माध्यमातून काही दिवसांतच तरुणांचे ब्रेनवॉश केले जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound