धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी-टाकरखेडा फाट्याजवळ जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी १९ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्निल दत्तात्रय निकम (वय ३८, रा. वाटिका आश्रम जवळ) हे १८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने बांभोरी फाट्याकडून जात होते. यावेळी संशयित आरोपी अमोल लांडगे (रा. शिव कॉलनी) याने जुन्या भांडणाची कुरापत काढून आपल्या ताब्यातील फोरव्हीलर गाडीने स्वप्निल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात झाल्यानंतर स्वप्निल यांनी “तू धडक का दिली?” असे विचारले असता, संशयित आरोपी अमोल लांडगे याने गाडीतून उतरून त्यांना अश्लील शिवीगाळ करून स्टीलचा रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी स्वप्निल निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल लांडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण तांदळे हे करीत आहे.



