Home क्राईम प्रशांत वाघ मृत्यू प्रकरणाची ‘सीआयडी’ चौकशी करा : ‘छत्रपती शिवाजी ब्रिगेड’ यांची...

प्रशांत वाघ मृत्यू प्रकरणाची ‘सीआयडी’ चौकशी करा : ‘छत्रपती शिवाजी ब्रिगेड’ यांची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथील कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे स्वयंसेवक कै. प्रशांत दिलीप वाघ यांच्या आत्महत्या प्रकरणात जामनेर पोलिसांनी दाखवलेली असंवेदनशीलता आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करावा, अशी आक्रमक मागणी ‘छत्रपती शिवाजी ब्रिगेड’ने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

खाजगी सावकार अजय प्रभाकर पोळ याच्या सततच्या मानसिक आणि अश्लील छळाला कंटाळून प्रशांत वाघ यांनी १७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येण्याऐवजी “प्रेताचा फोटो काढून ठेवा आणि स्वतःच रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठवा” असा अजब आणि निर्दयी सल्ला दिला, असा आरोप कुटुंबाने केला आहे.

पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप :
छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली. “पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी १५ दिवस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. उलट, पीडित कुटुंबाला ‘प्रकरण आपसात मिटवून घ्या, काय मिळेल ते घेऊन टाका’ असा सल्ला दिला,” असे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय, पोलीस शिपाई सचिन महाजन यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा खळबळजनक आरोपही कुटुंबाने केला आहे.

आंदोलनाचा इशारा :
घरातील कर्ता मुलगा गमावल्याने वाघ कुटुंब उध्वस्त झाले आहे. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि शिपाई सचिन महाजन यांना तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी वडील दिलीप वाघ आणि मामा युवराज साबळे यांनी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोर प्रखर आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी ब्रिगेडने दिला आहे.


Protected Content

Play sound