जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या गोदावरी संगीत महाविद्यालयातील दिव्यांग नेत्रहीन विद्यार्थिनी नाजनीन तबस्सुम जमील शेख हिने आपल्या सुमधुर आवाजाने थेट राष्ट्रपती भवनात उपस्थितांची मने जिंकत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. नवी दिल्ली येथील अमृत उद्यानात आयोजित ‘पर्पल फेस्टिव्हल’मध्ये तिच्या गायनाने वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. नाजनीनने सादर केलेल्या “गणाधीशाय गुणमण्डिताय” या गीताने उपस्थित मान्यवर मंत्रमुग्ध झाले. तिच्या सादरीकरणानंतर राष्ट्रपतींसह अनेक मान्यवरांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या दिव्यांग विद्यार्थिनीने राष्ट्रपती भवनासारख्या प्रतिष्ठित स्थळी आपली कला सादर केल्याने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नाजनीनचा हा प्रवास जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा उत्तम नमुना आहे. ती दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पांतर्गत दिल्ली येथे गेली होती. सध्या ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या गायन कलेलाही तेवढेच महत्त्व देत आहे. गेल्या तीन वर्षांपासून गोदावरी संगीत महाविद्यालयात प्राचार्या पद्मजा नेवे आणि इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती शास्त्रीय संगीताचे धडे घेत असून, तिच्या कलेला सातत्याने पैलू पडत आहेत.
नाजनीनच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालक डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भिरूड यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



