रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या वाढत्या अडचणींवर केंद्र सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जाणार असल्याचे संकेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाशी थेट संवाद साधत त्यांनी विविध समस्यांवर सखोल चर्चा केली असून, लवकरच ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
गुरुवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित बैठकीत केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. या बैठकीत केळी निर्यात, बाजारभावातील चढ-उतार, व्यवहारातील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील आणि संचालक पितांबर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचे वास्तव चित्र समोर ठेवत ठोस उपाययोजनांची मागणी केली.

केळीच्या दरात होणाऱ्या प्रचंड अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. सध्या रावेर तालुक्यातील व्यवहार बऱ्हाणपूर बाजार समितीच्या दरांवर अवलंबून असल्याने, स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्र दरनिर्धारण यंत्रणा लागू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. यासाठी कायदेशीर पाठबळ देण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली.
याशिवाय, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये केळी विक्रीनंतर व्यापाऱ्यांकडून पेमेंट थकवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
बैठकीत टिश्यू कल्चर रोपांवर अनुदान, ‘करपा’ रोगासाठी विशेष पॅकेज, रोग निर्मूलनासाठी व्यापक मोहीम तसेच रावेरमध्ये केळी प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासोबतच केळी निर्यातीस चालना देण्यासाठी रेल्वे वाहतुकीसाठी ‘केळी व्हॅगन’वर अनुदान, देशांतर्गत मोठ्या बाजारपेठांशी थेट जोडणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात वाढवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
या बैठकीस राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल जावळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना रावेर बाजार समितीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. तसेच बऱ्हाणपूर प्रशासनाशी समन्वय साधून समस्यांवर तोडगा काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.
“केळी उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक असून, लवकरच ठोस निर्णय घेतले जातील,” असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिले आहे. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी रावेर बाजार समितीला भेट देणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती प्रल्हाद पाटील यांनी दिली.



