जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाच्या निमित्ताने जळगाव शहरात जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेली स्वागत यात्रा उत्साहात आणि भव्यतेत पार पडली. शहरातील प्रमुख मार्ग भगव्या रंगाने न्हाऊन निघाले असून, हजारो साधक-भक्तांच्या उपस्थितीने वातावरण भक्तिमय झाले होते.
जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र शुद्ध १, शके १९४८, गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी या स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकले राममंदिर येथून यात्रेला सुरुवात होऊन शिवाजी पुतळा चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक मार्गे ग्रामदैवत श्रीराम मंदिर रथ चौक येथे यात्रेची सांगता करण्यात आली. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात्रेचे स्वागत केले.

यात्रेच्या प्रारंभी रथामध्ये गुरुपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला विजय लक्ष्मण बांधेल, धर्मराज फाउंडेशनचे विनायक भाऊ पाटील, नगरसेविका पूजा विजय जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हा निरीक्षक गणेश राकडे, उत्तर महाराष्ट्र उपपीठ प्रसिद्धी प्रमुख डिगंबर टोके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल दांगोडे, जिल्हा महिला अध्यक्षा उषाताई कोळी, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बोरसे, नरेंद्र खाचणे आदींचीही उपस्थिती लक्षणीय होती.
यात्रेत आकर्षक बॅनर, निशानधारी महिला-पुरुष, बँड पथक, कलशधारी महिला आणि पारंपरिक वेशातील वासुदेव यांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. श्रीराम पंचायतनाच्या देखाव्याबरोबरच मरणोत्तर देहदान व अवयवदान यांसारख्या सामाजिक उपक्रमांवरील देखावे सादर करण्यात आले. याशिवाय जय मल्हार, संत गजानन महाराज, भारत माता यांचे देखावे, लेझीम पथक आणि भजनी मंडळांनी वातावरण भारावून टाकले.
या यात्रेत विविध सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन सहभागी झालेल्या भक्तांनी हिंदू धर्माचे संवर्धन आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. संपूर्ण जळगाव शहरात भगव्या रंगाची उधळण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या स्वागत यात्रा महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, बिहार, जम्मू-काश्मीर तसेच परदेशातही काढण्यात येत असल्याने या उपक्रमाचे व्यापक स्वरूप अधोरेखित झाले.
रामानंद संप्रदाय, जिल्हा जळगाव यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून सेवा समित्या, सेवा केंद्र समित्या तसेच साधक-भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भव्य आयोजनामुळे जळगाव शहरात नववर्षाचे स्वागत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात साजरे करण्यात आले.



