Home राजकीय अजित पवार यांच्या अपघातामागे मोठी शक्ती : रोहित पवारांचा गंभीर आरोप

अजित पवार यांच्या अपघातामागे मोठी शक्ती : रोहित पवारांचा गंभीर आरोप


मुंबई-वृत्तसेवा । राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाती मृत्यूवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. या प्रकरणावर विधिमंडळात चर्चा करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाला असून, आमदार रोहित पवार यांनी “या अपघातामागे मोठी शक्ती आहे” असा गंभीर आरोप केला आहे.

अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. सुरुवातीपासूनच हा अपघात नसून घातपात असल्याची शंका विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी याप्रकरणी अनेकदा आवाज उठवला असून, सखोल चौकशीची मागणीही केली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर विधिमंडळात चर्चा व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी प्रयत्न केले होते. रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन स्थगन प्रस्तावाद्वारे या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली होती. मात्र, अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त करताना म्हटले की, “राज्यातील एका प्रमुख नेत्याचा मृत्यू होतो आणि त्यावर चर्चा करण्यासही परवानगी दिली जात नाही, याचा अर्थ काय? या निर्णयामुळे आमच्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. या अपघातामागे निश्चितच एखादी मोठी शक्ती असू शकते.”

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले की, “आमचा आवाज दाबला जात आहे. आम्ही जेव्हा या प्रकरणावर बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला रोखले जाते. यावरून स्पष्ट होते की सत्ताधाऱ्यांना हा विषय चर्चेला नको आहे. जर चर्चा होऊ दिली जात नसेल, तर यामागे सत्ताधाऱ्यांपैकीच कुणीतरी जबाबदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत, “या व्यक्तीचे नाव बाहेर येऊ नये म्हणूनच आम्हाला ना एफआयआर करू दिला जात आहे, ना चर्चा. सीबीआय चौकशीसाठीही अद्याप प्रस्ताव पाठवलेला नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

रोहित पवार यांनी शेवटी इशारा देत म्हटले की, “सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.”


Protected Content

Play sound