जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेने बुधवार, १८ मार्च रोजी मोठी कारवाई करत भंगार बाजार, लड्डा फार्म हाऊससमोरील परिसर आणि अजिंठा चौफुली येथील अतिक्रमणे हटवण्यात आली. या कारवाईमुळे परिसर मोकळा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महापौर दिपमाला काळे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली असून उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाने सकाळपासूनच धडक कारवाई सुरू केली. अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरात पाहणी करत अनधिकृत बांधकामे आणि अडथळे हटवले.
भंगार बाजार आणि अजिंठा चौफुली परिसरात रस्त्यालगत उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने, फड आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रशासनाने संबंधितांना पूर्वसूचना देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. तरीही अतिक्रमण कायम राहिल्याने अखेर कठोर पावले उचलण्यात आली.

दरम्यान, कार बाजार परिसरातील व्यावसायिकांना आपला व्यवसाय दुसरीकडे हलवण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या कालावधीत जागा रिकामी न केल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेत साजिद अली, संजय पाटील, नाना कोळी, सतीश ठाकरे यांच्यासह अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. या उपक्रमामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून सार्वजनिक जागांचा योग्य वापर सुनिश्चित होणार आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांनी नियमांचे पालन करून शहर स्वच्छ आणि सुबक ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.



