जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी पाडव्याच्या पावन मुहूर्तावर जळगावात ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ या प्रात:कालीन सुगम संगीताच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील रसिकांना सुरेल वातावरणाची अनोखी मेजवानी मिळणार आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि मराठी नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो. या मंगलदिनी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यान येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकार्य लाभले असून विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आमदार राजुमामा भोळे, शहराच्या प्रथम नागरिक महापौर दिपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
स्वरोत्सवात शहरातील गुणी कलावंत आपली कला सादर करणार आहेत. सौ. श्रुती जोशी आणि वरुण नेवे यांचे सुगम संगीत सादरीकरण, तर कु. राजेश्वरी रत्नपारखी यांचे बासरी वादन रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या सादरीकरणाला राजेंद्र माने यांची संवादिनीवर साथ आणि राहुल कासार यांची तबल्यावर साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सौ. प्रिती झारे करणार आहेत.
या प्रात:कालीन मैफिलीच्या माध्यमातून गुढी पाडव्याचा दिवस अधिक मंगलमय करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. शहरातीलच कलावंतांकडून सादर होणारा हा स्वरोत्सव रसिकांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे. आयोजकांनी सर्व संगीतप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.



