मुंबई-वृत्तसेवा । अमेरिकेत लोकसंख्येच्या केवळ सुमारे 2 टक्के असलेल्या भारतीय वंशाच्या समुदायाने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. बीसीजी (BCG) आणि इंडियास्पोरा यांनी प्रसिद्ध केलेल्या “अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांच्या सामर्थ्याची कहाणी” या अहवालानुसार, अमेरिकेच्या बौद्धिक आणि संशोधन क्षेत्रात भारतीय डायस्पोराचा वाटा सातत्याने वाढत असून तो अनेक पटींनी अधिक झाला आहे.
अहवालानुसार, अमेरिकेतील दर 10 पैकी 1 डॉक्टर भारतीय वंशाचा आहे. हे डॉक्टर बहुधा दुर्गम आणि वंचित भागांमध्ये आरोग्य सेवा पुरवत असून देशातील डॉक्टरांच्या कमतरतेची मोठ्या प्रमाणावर भरपाई करत आहेत. दरवर्षी सुमारे 1,800 नवीन भारतीय वंशाचे डॉक्टर अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेत सामील होत आहेत. त्याचबरोबर सुमारे 38 हजार भारतीय वंशाच्या परिचारिका (नर्सेस) अमेरिकेत कार्यरत आहेत.

संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातही भारतीय वंशाच्या लोकांचा प्रभाव लक्षणीय आहे. पेटंट दाखल करण्यापासून ते वैज्ञानिक शोधनिबंधांच्या प्रकाशनापर्यंत भारतीय डायस्पोराचा सहभाग 1975 नंतर पाच पटीने वाढला आहे. 1975 मध्ये अमेरिकेतील पेटंटमध्ये भारतीयांचा वाटा 1.9 टक्के होता, जो 2019 मध्ये वाढून 10 टक्क्यांवर पोहोचला आहे. वैज्ञानिक संशोधन पत्रांमध्येही भारतीय वंशाचा सहभाग सुमारे 13 टक्के आहे.
पुरस्कार आणि शैक्षणिक क्षेत्रातही भारतीय वंशाच्या लोकांनी आपली छाप सोडली आहे. 1968 मध्ये हर गोविंद खुराना आणि 2019 मध्ये अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार मिळाला. 2014 मध्ये मंजुल भार्गव यांनी ‘गणिताचे नोबेल’ मानल्या जाणाऱ्या फील्ड्स मेडलवर आपले नाव कोरले. स्पेलिंग बी या प्रतिष्ठित स्पर्धेत तर 2000 नंतर 26 वर्षांत 34 पैकी तब्बल 28 विजेते भारतीय वंशाचे होते.
शिक्षण क्षेत्रातही भारतीयांचा प्रभाव वाढत आहे. अमेरिकेतील टॉप-50 विद्यापीठांपैकी 35 संस्थांमध्ये भारतीय वंशाचे प्राध्यापक, डीन किंवा प्रशासकीय नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये 22 हजारांहून अधिक भारतीय वंशाचे प्राध्यापक अध्यापन करत आहेत. हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्येही भारतीय वंशाच्या व्यक्ती नेतृत्व पदांवर दिसत आहेत.
तंत्रज्ञान क्षेत्रातही भारतीय वंशाच्या अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. 2017 मध्ये गुगलच्या अभियंत्यांनी लिहिलेल्या जनरेटिव्ह एआयच्या पायाभूत संशोधनपत्रात आठपैकी दोन अभियंते भारतीय वंशाचे होते. या संशोधनाला आजच्या लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा आधार मानले जाते, ज्यावर चॅटजीपीटीसारख्या आधुनिक एआय तंत्रज्ञानाची उभारणी झाली आहे.
आरोग्य क्षेत्रात पुढील दशकात अमेरिकेसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. 2032 पर्यंत देशात सुमारे 1.22 लाख डॉक्टरांची कमतरता निर्माण होण्याचा अंदाज आहे. तसेच 2027 पर्यंत सुमारे 8 लाख परिचारिका काम सोडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय वंशाचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ‘संकटमोचक’ ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



