Home Cities पारोळा राहुल गांधींच्या संसदेतील ‘त्या’ कृतीचा निषेध; पारोळ्यात जोरदार निदर्शने

राहुल गांधींच्या संसदेतील ‘त्या’ कृतीचा निषेध; पारोळ्यात जोरदार निदर्शने


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली येथे सुरू असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेत्यांकडून संसदेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत, आज पारोळा शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर खासदारांनी संसदेच्या ‘मकर प्रवेशद्वारा’जवळ केलेल्या वर्तनाचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

सध्या दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संसदेच्या मकर प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत घोषणाबाजी केली. लोकसभा अध्यक्षांच्या स्पष्ट निर्देशानुसार, या प्रवेशद्वाराजवळ कोणत्याही प्रकारचे धरणे किंवा निदर्शने करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही काँग्रेस खासदारांनी या ठिकाणी आंदोलन करून संसदेला “पिकनिक स्पॉट” बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

पारोळ्यात संतापाची लाट :
संसदेच्या नियमावलीचा भंग केल्याच्या निषेधार्थ पारोळा येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरात एकत्र येत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. “लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अवमान करणाऱ्यांचा निषेध असो,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. संसदेची प्रतिमा मलिन करण्याचे काम काँग्रेसकडून जाणीवपूर्वक केले जात असल्याची टीका यावेळी उपस्थित नेत्यांनी केली.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती :
या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील, मंडल अध्यक्ष अतुल पवार, छोटू पाटील, धीरज महाजन, अनिकेत कोळपकर, नगरसेवक अमोल शिरोडे, तालुका सरचिटणीस विनोद पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सचिन गुजराती यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound