जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ भागातील एथर शोरूमसमोरून एका रिक्षाचालकाची ४५ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनीवारी १४ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, शुभम प्रकाशचंद राठी (वय ३१, रा. गणपती नगर, कुसुंबा खुर्द, जळगाव) हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी १३ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शुभम राठी हे नवीपेठ भागातील एथर शोरूमजवळून जात असताना, अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या संमतीवाचून आणि लबाडीच्या इराद्याने त्यांच्याकडील निळ्या रंगाची कापडी पिशवी ज्यात ४५ हजार रूपयांची रोकड ठेवलेले चोरून नेले.

याबाबत शुभम राठी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद देण्यात आली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ हे करीत आहे.



