पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चेट्रीचंद्र आणि गुढीपाडवा या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने २० मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सिंधी समाजाचे ईष्टदेव भगवान झुलेलाल यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या चेट्रीचंद्र उत्सवाबरोबरच हिंदू नववर्षाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः थॅलेसेमिया सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासत असल्याने समाजाने पुढे येणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत झुलेलाल मंदिर, सिंधी कॉलनी, पाचोरा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जळगाव येथील रेड क्रॉस ब्लड बँकेचे सहकार्य लाभणार असून प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत रक्त संकलन केले जाणार आहे. रक्तदात्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात येणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.
या उपक्रमाचे नेतृत्व रवी सोनार आणि त्यांच्या सहकारी गटाकडून करण्यात येणार असून समाजातील विविध घटकांचा या शिबिराला पाठिंबा मिळत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



