Home आरोग्य ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती 

‘नो स्मोकिंग डे’ निमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धूम्रपानामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि त्यापासून दूर राहणे हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा ठाम संदेश ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. रोटरी क्लब ऑफ भुसावळ आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी मार्गदर्शन करताना धूम्रपानमुक्त जीवनाचा प्रभावी संदेश दिला.

भुसावळ येथील या कार्यक्रमात प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि डॉक्टरांना संबोधित करताना सांगितले की, “एक सिगारेट आयुष्य कमी करत असेल, पण धूम्रपान करण्याचा एक निर्णय आयुष्य वाचवू शकतो.” त्यांनी तंबाखू आणि सिगारेट सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसन कसे लागते आणि त्यातून विविध गंभीर आजार कसे निर्माण होतात याबाबत सविस्तर माहिती दिली. विविध संशोधन आणि सर्वेक्षणांच्या आधारे त्यांनी सांगितले की तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे विकार तसेच श्वसनाशी संबंधित गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

प्रा. डॉ. राणे यांनी पुढे सांगितले की भारतात दरवर्षी लाखो लोक तंबाखूजन्य आजारांमुळे मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे समाजात धूम्रपानविरोधी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर हे समाजासाठी रोल मॉडेल असतात, त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आणि डॉक्टरांनी स्वतः धूम्रपानापासून दूर राहून समाजासमोर योग्य आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयरोग तज्ञ संचालक, डॉ. वैभव पाटील, स्त्रीरोग शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ. माया आर्वीकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग आणि एमबीबीएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. दयाघन राणे यांचा परिचय वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर यांनी करून दिला, तर स्वागत डॉ. माया आर्वीकर यांनी केले. अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि डॉ. वैभव पाटील यांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सदस्य रो. गजानन सेवलकर यांनी केले. तसेच रोटरी क्लबचे सचिव रो. रत्नाकर क्षीरसागर यांचे स्वागत डॉ. प्रशांत सोळंके यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. एन. एस. आर्वीकर यांनी केले. या कार्यक्रमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना धूम्रपानमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला आणि समाजात तंबाखूविरोधी जनजागृती वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound