चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, नुकतीच टिळक चौक परिसरातील ‘गुप्ता एजन्सी’ या दुकानात धाडसी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सुमारे ४७ हजार ७०० रुपये किमतीचा विविध नामांकित कंपन्यांचा किराणा माल चोरून नेला आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबबात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील टिळक चौकात राहणारे जितेश सतीश गुप्ता (वय ५० वर्षे) यांचे प्रतिपदा नगर, देशमुख राजपूत स्मशान भूमीसमोर ‘गुप्ता एजन्सी’ नावाचे दुकान आहे. ९ मार्च ते ११ मार्चच्या दरम्यान, चोरट्यांनी बंद दुकानाच्या संधीचा फायदा घेत ही चोरी केली. चोरट्यांनी दुकानातील संतूर साबण, सरगम साबण, सम्राट मैदा, वाघ बकरी चहा, पार्ले बिस्किटे आणि अगरबत्ती यांसारख्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला ४७ हजारांचा किराणा माल चोरून नेला.

याप्रकरणी जितेश गुप्ता यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी योगेश मांडोले हे करीत आहे.



