Home Cities जळगाव कला, फॅशन आणि उद्योजकतेचा संगम; ‘वर्षोल्हास 2K26’ प्रदर्शनाचे उद्घाटन

कला, फॅशन आणि उद्योजकतेचा संगम; ‘वर्षोल्हास 2K26’ प्रदर्शनाचे उद्घाटन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स, जळगाव येथे विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला आणि उद्योजकीय क्षमतेला व्यासपीठ देणारे ‘वर्षोल्हास 2K26’ फॅशन व स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन उत्साहात पार पडत आहे. दिनांक १२ आणि १३ मार्च रोजी आयोजित या प्रदर्शनाचा शुभारंभ प्रिन्सेस किवा वैभव पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळत असून महाविद्यालय परिसरात नवउद्योजकांचा उत्साही मेळा भरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील आणि डॉ. प्रशांत वारके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रदर्शनात विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विविध आकर्षक वस्तू तयार करून सादर केल्या. यामध्ये बांधणी साड्या, दुपट्टे, पर्स आणि बॅग, स्केचिंग केलेल्या बॅग, वन पीस ड्रेस, घागरे, विविध प्रकारचे पेंटिंग व फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी आणि नेल आर्ट, सौंदर्यप्रसाधने, मॅक्रमे वस्तू, आरीवर्क ब्लाऊज, एम्ब्रॉयडरी रुमाल, ग्रीटिंग कार्ड, फोटो फ्रेम, रंगोली, ज्वेलरी तसेच हाताने तयार केलेले ज्वेलरी किट अशा अनेक वस्तूंचा समावेश होता.

प्रदर्शनात विद्यार्थिनींनी तयार केलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि मुखवासही उपलब्ध करून देण्यात आले होते. या सर्व वस्तूंमधून विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेसोबतच त्यांच्या कौशल्यपूर्ण हातकलेचे उत्कृष्ट दर्शन घडले. स्वनिर्मित वस्तूंची विक्री करून विद्यार्थिनींना प्रत्यक्ष उद्योजकतेचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. कविता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी मीनल राणे, कविता भोरटक्के, जयश्री कुलकर्णी, हिमानी जमाले आणि शुभांगी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या बळावर साकारलेल्या वस्तूंना भेट देण्यासाठी विद्यार्थी, पालक तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थिनींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासोबतच उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. त्यामुळे ‘वर्षोल्हास 2K26’ हे प्रदर्शन विद्यार्थिनींच्या सर्जनशीलता आणि उद्योजकीय क्षमतेला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे दिसून आले.

 


Protected Content

Play sound