पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू लागली असून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारला इशारा देत गॅस टंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आखाती देशांमधून भारताकडे होणारा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह देशभरात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस युद्ध सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

या विषयावर प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे यांनी सांगितले की, गॅस टंचाईमुळे मोठ्या शहरांमध्ये हॉटेल्स आणि खानावळींवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये गॅसच्या कमतरतेमुळे अनेक हॉटेल्स आणि मेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा उदरनिर्वाह या खानावळींवर अवलंबून असतो. गॅस तुटवड्यामुळे या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास केंद्र सरकारशी चर्चा करून गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास आम्ही मागे हटणार नाही, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, गॅस तुटवड्याचा फटका पुण्यातील हॉटेल व्यवसायालाही बसू लागला आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्सना त्यांच्या मेन्यूमध्ये बदल करावा लागत आहे. काही पदार्थ तयार करण्यासाठी जास्त वेळ आणि गॅस लागतो, त्यामुळे अशा पदार्थांची विक्री तात्पुरती बंद करण्याचा निर्णय काही हॉटेल्सनी घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना काही मर्यादित पदार्थच उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, गॅस तुटवड्यामुळे काही पदार्थ तयार करणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, एकाचवेळी शिजवून तयार करता येणारे पदार्थ ग्राहकांना देता येत आहेत; मात्र ऐनवेळी तयार करावे लागणारे पदार्थ देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना इडली किंवा वडा मिळू शकतो, मात्र डोसा मिळणे कठीण झाले आहे. जर गॅस पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर पुढील दोन ते तीन दिवसांत पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
गॅस टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यात चिंता वाढत आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.



