मुंबई-वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या प्रगतीसाठी संविधानाच्या चौकटीत राहून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. लोकभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

याआधी सोमवारी जिष्णू देव वर्मा यांचे पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह मुंबईत आगमन झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राम शिंदे, आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होते. विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
जिष्णू देव वर्मा यांनी यापूर्वी तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे त्रिपुरा येथील राजघराण्यातील असून त्यांनी 2018 आणि 2023 या कालावधीत त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे त्यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला. 1990 साली त्यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले.



