
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात 80 वर्षीय वृद्ध महिलेवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीवर तातडीने कडक कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत जळगाव येथे महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे घरात एकट्या असलेल्या 80 वर्षांच्या वृद्ध महिलेवर आरोपी रमजान शेख याने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सन्मान केला जात असताना अशा प्रकारची अमानवी आणि संतापजनक घटना घडल्याने सामाजिक संस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या प्रकरणाचा भारतीय जनता पार्टी जळगाव तसेच खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर कठोर संदेश देण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच या प्रकरणात राज्य शासनाने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, जेणेकरून पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळू शकेल, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय अत्याचारग्रस्त वृद्ध महिलेला राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई बारी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुनिता प्रदीप पाटील, वसुधा जोशी, शिला रंगरे, बायजाबाई माळी, पूजा जितेंद्र सोनवणे, विजया गांजरे, बासु कामत, पुनम सैनार, शारदा तायडे, शंकुतला मिस्त्री यांसह अनेक महिलांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून या घटनेचा निषेध व्यक्त केला.



