Home क्राईम ग्रामरोजगार सहाय्यकावर सरपंच पतीचा कथित हल्ला ; कारवाईसाठी संघटनेचा उपोषणाचा इशारा

ग्रामरोजगार सहाय्यकावर सरपंच पतीचा कथित हल्ला ; कारवाईसाठी संघटनेचा उपोषणाचा इशारा


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कंकराज येथे ग्रामरोजगार सहाय्यकावर सरपंच पतीने कथित हल्ला करून शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेविरोधात ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर तातडीने शासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

मनरेगा अंतर्गत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्णयांनुसार ग्रामीण भागात मजुरांच्या कामांचे नियोजन आणि देखरेख करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सहाय्यकांवर असते. त्यानुसार कंकराज येथील ग्रामरोजगार सहाय्यक गुलाब शिंदे हे आपले कामकाज करत असताना महिला सरपंचांचे पती राजाराम आप्पा यांनी त्यांच्या कामकाजाबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर २६ सप्टेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार ही तक्रार निकाली काढण्यात आली होती. या पत्रात सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामरोजगार सहाय्यकांवर कोणतीही कारवाई करू नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

मात्र संबंधित पत्राची अंमलबजावणी ग्रामपंचायत अधिकारी सरदार यांनी केली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ग्रामपंचायतीतील अनेक कामे सरपंच पती आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे चौकशी अहवाल असूनही संबंधित निर्णयाची दखल घेतली गेली नसल्याचे सांगण्यात आले.

संघटनेच्या निवेदनानुसार, या पत्रामुळे संतापलेल्या सरपंच पतीने पंचायत समिती परिसरात येऊन ग्रामरोजगार सहाय्यक व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच अश्लील शब्द वापरून धमक्या दिल्या आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी बाहेरून काही लोकांना जमवून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “माझा मुलगा अँटी करप्शनमध्ये डीवायएसपी आहे, माझे पोलिसांकडे काहीच होणार नाही,” असे सांगत धमकावण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे तालुक्यातील प्रशासनिक कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासकीय कार्यालयाच्या परिसरातच अशा प्रकारची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेत तालुक्यातील एका दिवंगत दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

या प्रकरणी संबंधितांवर तातडीने शासकीय कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. तसेच येत्या दहा तारखेला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

निवेदन देताना संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, प्रभारी तालुकाध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर भाई, तालुका सचिव राजेंद्र विसावे, सचिन पाटील, गुलाब शिंदे, प्रमोद ठाकरे, नंदू राजपूत, शिवाजी हटकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.


Protected Content

Play sound