
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण अधिक गतिमान व्हावे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर व्हावी, यासाठी आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. ६ मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ विविध रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

विकासासाठी नेत्यांचे सहकार्य :
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील जनतेची गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या निधीसाठी विशेष मागणी केली होती. सरकारने या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी दिल्याने मतदारसंघातील रस्त्यांचे जाळे आता अधिक भक्कम होणार आहे.
या १३ प्रमुख कामांचा मार्ग झाला मोकळा :
मंजूर झालेल्या २५ कोटींच्या निधीतून मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्यातील महत्वपूर्ण रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने: मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा, खांडवी, कोथळी आणि पूर्णाड परिसरातील रस्त्यांची सुधारणा. बोदवड तालुक्यातील नायगाव, सावखेडा आणि किन्ही-खंडाळा रस्ते. रावेर तालुक्यातील खिरोदा, पाल, मोरव्हाल आणि खिर्डी परिसरातील रस्ते विकास. मुक्ताईनगर येथे गजानन महाराज मंदिराजवळ लहान पुलाचे बांधकाम. अशी कामे होणार आहे.
मतदारसंघात आनंदाचे वातावरण :
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. आता निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघाचा कायापालट होणार असून कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे. “मतदारसंघातील जनतेला दर्जेदार रस्ते मिळावेत ही माझी प्राथमिकता आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून आपण विकासाची गंगा घराघरात पोहोचवत आहोत,” असे प्रतिपादन आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.



