Home Cities अमळनेर आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अर्थसंकल्पात अमळनेरला २५ कोटी

आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अर्थसंकल्पात अमळनेरला २५ कोटी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली. या निधीतून मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण तसेच विविध पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असून स्थानिक विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अमळनेर मतदारसंघात गेल्या काही वर्षांत विकासाचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते, पूल तसेच अन्य पायाभूत सुविधांची अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे सध्या वेगाने सुरू आहेत. या विकासामुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असल्याचेही स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाल्याने मतदारसंघात समाधानाचे वातावरण आहे.

या निधीतून मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन या राज्य महामार्ग क्रमांक १५ वर रेल्वे उड्डाणपुल ते दहिवद फाटा या दरम्यान रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुसळी फाटा-धरणगाव-अमळनेर-शिंदखेडा या राज्य महामार्ग क्रमांक ६ वर भरवस ते रेल्वे बोगदा या भागातील रस्त्याच्या सुधारणेसाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याशिवाय रा.मा. ३९ ते जांभोरा-ढेकू-हेडावे-अमळनेर-शिरसाळे-वावडे-मांडळ या मार्गावरील शिरसाळे ते वावडे या भागातील रस्त्याच्या सुधारणेसाठी २.५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बोळे-मोंढाळे-फाफोरे-अमळनेर-मारवड-निंम-कपिलेश्वर या मार्गावरील कळमसरे ते निंम या दरम्यानच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी २.५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

चोपडा-चुंचाळे-चौगाव-लासूर-कलाली-निंभोरा-पिंगळवाडे-नंदगाव या प्रजिमा-०३ मार्गावर निंभोरा ते पिंगळवाडे गावांदरम्यान चिखली नदीवरील पुलाला पोहोच रस्ता करण्यासाठी २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बोळे-मोंढाळे-फाफोरे-अमळनेर-मारवड-निंम-कपिलेश्वर या मार्गावरील धार ते मारवड या भागासाठी २.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

रुबजी नगर ते हिंगोणा या दरम्यानच्या रस्त्याच्या मजबुतीकरणासह सुधारणा करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अमळनेर ते धार या मार्गाच्या सुधारणेसाठी २.५ कोटी रुपये तर पारोळा तालुक्यातील बहादरपूर ते फाफोरे या मार्गावरील रस्त्याच्या सुधारणेसाठी १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण २५ कोटी रुपयांची विविध विकासकामे या अर्थसंकल्पात मंजूर झाली आहेत.

या निधीमुळे मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासोबतच ग्रामीण भागातील संपर्क मार्ग अधिक मजबूत होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. या कामांमुळे नागरिकांना प्रवास सुलभ होईल तसेच विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या निधीसाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनित्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.


Protected Content

Play sound