Home क्राईम नागरिकांच्या सतर्कतेमुळे अवैध उत्खनन उघड; मुक्ताईनगरमध्ये चार डंपर जप्त

नागरिकांच्या सतर्कतेमुळे अवैध उत्खनन उघड; मुक्ताईनगरमध्ये चार डंपर जप्त


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील ईदगाह परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाचा प्रकार नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अवैधरित्या उत्खनन करणारे चार डंपर आणि एक मोठे पोकलेन पकडून ते थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध उत्खननाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

घटनेनंतर पकडलेली सर्व वाहने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अवैध उत्खननाच्या प्रकारांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जोरदारपणे केली. परिसरातील अनेक नागरिकांनी प्रशासनाने यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली.

स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, जप्त करण्यात आलेले पोकलेन आणि डंपर हे बी. एन. अग्रवाल यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ईदगाह परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून सुरू असलेले काम थांबवले आणि संबंधित वाहने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाच्या प्रकारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. आता नागरिकांच्या पुढाकारामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर डंपर आणि पोकलेन पकडले गेल्याने प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही कारवाई शाकीर सय्यद, वसीम सय्यद, सलीम शेख शब्बीर, इरफान मुसा आणि शेख अजगर सय्यद यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने केली.


Protected Content

Play sound