Home Cities पारोळा गिरणा फीडर कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

गिरणा फीडर कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गिरणा फीडर कालवा पुन्हा सुरू करून धरण भरण्यासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा तालुक्यातील बाहुटे परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. शासनाकडून एका महिन्याच्या आत कालवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या पंधरा वर्षांपासून कनेरे, तूराटखेडे, मराठखेडे, सावखेडे आणि भालगाव परिसरातील धरण भरण्यासाठी आवश्यक असलेला गिरणा फीडर कालवा बंद अवस्थेत असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. या कालव्यातून पाणी मिळाल्यास शेतीला मोठा दिलासा मिळू शकतो, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले.

या मागणीसंदर्भात ४ फेब्रुवारीपासून जिल्हा व तालुका स्तरावर विविध शासकीय अधिकाऱ्यांशी बैठका सुरू होत्या. मात्र कालवा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. सकाळी दहा वाजता संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने गिरणा कालव्यात उतरले आणि पाण्यात बसून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरू झाली.

जिल्हा अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन आणि त्यांच्या पथकाने आंदोलकांशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र शेतकऱ्यांनी मागणी पूर्ण होईपर्यंत किंवा शासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका ठामपणे मांडली. अखेर दुपारी सुमारे दोन वाजून दहा मिनिटांनी लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धनगर यांनी शासनाच्या वतीने पत्र देत एका महिन्याच्या आत संबंधित फीडर कालवा सुरू करण्यात येईल, अशी लेखी हमी दिली.

या लेखी आश्वासनानंतर शेतकरी नेते सुनील देवरे आणि आंदोलकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र एका महिन्याच्या आत कालवा सुरू झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारोळा पोलिस ठाण्याकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, कार्याध्यक्ष गुलाब पाटील, जलसंधारण समितीचे तालुकाध्यक्ष एस. झेड. पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा सचिव नितीन पाटील, तालुका युवा अध्यक्ष निरंजन पाटील, शाखाप्रमुख समाधान पाटील, शुभम पाटील, सागर पाटील, सुखदेव पाटील, पंढरीनाथ खैरनार, गणेश पाटील, विकास पाटील, चतुर पाटील, रवींद्र पाटील, आबा पाटील, मुकेश पाटील, प्रवीण पाटील, धनंजय पाटील यांच्यासह भालगावचे सरपंच गोविंदा पाटील, भिका पाटील, कैलास पाटील, प्रेमराज पाटील, आनंदराव पाटील, चंद्रकांत पाटील आणि अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तुराटखेडे, सावखेडे आणि भालगाव परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांचीही मोठी उपस्थिती आंदोलनस्थळी दिसून आली.


Protected Content

Play sound