
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान संस्था (UICT) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ओपन हाऊस’ या तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण आणि सांगीतिक वातावरणात पार पडला. या समारोप सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक कैवल्य केजकर यांची रंगतदार संगीत मैफल. त्यांच्या सुरेल आवाजाने विद्यापीठाचे पदवीप्रदान सभागृह अक्षरशः दुमदुमून गेले आणि उपस्थित तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

तीन दिवस चाललेल्या ‘ओपन हाऊस’ महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपावेळी कैवल्य केजकर यांच्या लाईव्ह संगीत सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. कैवल्य यांनी आपल्या दमदार आणि खणखणीत आवाजात ‘मोरया मोरया’, ‘झिंग झिंग झिंगाट’सह अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाणी सादर केली. त्यांच्या सुरेल गायकीने आणि जोशपूर्ण सादरीकरणाने सभागृहातील वातावरण भारावून गेले. गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई अक्षरशः थिरकू लागली आणि कार्यक्रमात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
कैवल्य केजकर यांनी आपल्या मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर संगीत क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ३५ हून अधिक गायन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत आपल्या प्रतिभेची छाप उमटवली आहे. ‘इंडियन आयडॉल’च्या १२ व्या पर्वात त्यांनी आपल्या सुरेल गायकीने प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली होती. तसेच ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय मराठी मालिकेतील शीर्षक गीतामुळे ते घराघरात परिचित झाले आहेत. त्यांच्या गायकीची हीच जादू कालच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाली.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते कैवल्य केजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, UICT चे संचालक डॉ. ए. के. गोस्वामी, कुलसचिव विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन संचालक योगेश पाटील, ओपन हाऊसचे समन्वयक डॉ. भूषण चौधरी, माजी केंद्रीय मूल्यमापन संचालक प्रा. दीपक दलाल, अधिसभा सदस्य विशाल पराते तसेच वित्त व लेखाधिकारी रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भूषण चौधरी यांनी केले. ‘ओपन हाऊस’चे यशस्वी आयोजन करण्यासाठी UICT विभागातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



