
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेहरुण येथे श्री काथार कंठहार वाणी समाज संचलित गाथा फाउंडेशनच्या वतीने आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

महोत्सवानिमित्त संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्याची आठवण करून देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थित मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात आध्यात्मिकता, समता आणि भक्तीभाव वाढविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अभंग व संतपरंपरेची महती सांगत संत तुकाराम महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाची साकारलेली सुंदर आणि आकर्षक आरास होय. सजावटीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणाने न्हाऊन निघाला होता. भाविकांनी आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे स्मरण करत भक्तीभावाने दर्शन घेतले.
या प्रसंगी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक अक्षय वंजारी, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक गणेश सोनवणे, काथार कंठहार वाणी समाजाचे अध्यक्ष डॉ. अमोल चंद्रकांत वाणी, गाथा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष भागवत वाणी, सचिव केतन वाणी, सहसचिव ललित वाणी, खजिनदार ज्ञानदेव वाणी, जगन्नाथ वाणी यांच्यासह समाजातील बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा प्रसार समाजात व्हावा आणि तरुण पिढीने संतपरंपरेचा वारसा पुढे न्यावा, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.



