Home आंतरराष्ट्रीय “इराणच्या नव्या सुप्रीम लीडरलाही संपवू…”; इस्रायलची उघड धमकी 

“इराणच्या नव्या सुप्रीम लीडरलाही संपवू…”; इस्रायलची उघड धमकी 


तेल अवीव- वृत्तसेवा। अमेरिकाइस्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यालाही थेट लक्ष्य केले जाईल, अशी उघड धमकी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दिली आहे. या विधानामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिवंगत अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेता पदावर निवड झाल्याची चर्चा सुरू आहे. इराणमधील असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने त्यांची निवड केल्याच्या वृत्तांदरम्यान काट्झ यांनी थेट इशारा दिला. “इराणमध्ये नियुक्त झालेला कोणताही नवा नेता जर इस्रायलचा नाश करण्याच्या योजना पुढे नेईल, तर त्याला लक्ष्य केले जाईल. त्याचे नाव काय आहे किंवा तो कुठे लपला आहे, याने काही फरक पडत नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले आहे.

काट्झ यांनी पुढे सांगितले की, इस्रायल आपल्या अमेरिकन मित्रराष्ट्रांसोबत मिळून इराणी राजवटीला पूर्णपणे संपवण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. इराणमधील जनतेनेच सध्याची राजवट उलथवून टाकावी, अशी परिस्थिती निर्माण करणे ही या रणनीतीचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे संघर्ष केवळ लष्करी न राहता राजकीय आणि वैचारिक पातळीवरही तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या युद्धाचा आज पाचवा दिवस असून दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. बुधवारी पहाटे तेहरानमध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलने इराणमधील क्षेपणास्त्र तळ आणि अणुसंशोधन केंद्रांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने अमेरिकन दूतावास आणि ऊर्जा पुरवठा केंद्रांवर हल्ले चढवले असल्याची माहिती आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष आणखी काही आठवडे चालू शकतो, असे संकेत दिले आहेत. आतापर्यंतच्या लढायांमध्ये इराणमधील सुमारे ८०० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये अस्थिरता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound