
बीजिंग-वृत्तसेवा | हेल्थकेअर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सातत्याने नवे प्रयोग करत असताना चीनने जगातील पहिले ‘एआय हॉस्पिटल’ सुरू करून मोठी झेप घेतली आहे. Tsinghua Universityच्या इन्स्टिट्यूट फॉर एआय इंडस्ट्री रिसर्चने विकसित केलेले ‘एजंट हॉस्पिटल’ हे पूर्णपणे एआय-आधारित वैद्यकीय मॉडेल असून, येथे ४२ एआय डॉक्टर आणि परिचारिका २४ तास कार्यरत असतात.

‘एजंट हॉस्पिटल’मध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल-आधारित इंटेलिजंट एजंटद्वारे एआय डॉक्टर स्वायत्त संवाद साधू शकतात. रुग्णांच्या नोंदणीपासून उपचार आणि फॉलोअपपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही स्मार्ट प्रणाली कार्यरत असते. रुग्णालयात येण्यापूर्वीची प्राथमिक प्रक्रिया, ट्रायजिंग (रुग्णांचे वर्गीकरण), तपासणी, निदान, सल्लामसलत, प्रिस्क्रिप्शन, पुनर्वसन आणि फॉलोअप या सर्व बाबी एआय प्रणाली हाताळते.
अवाढव्य वैद्यकीय साहित्याचे विश्लेषण करून आणि सतत अनुभवातून शिकत एआय डॉक्टर स्वतःची निदान व उपचार क्षमता अधिक सक्षम करतात. त्यामुळे उपचाराची गती वाढते आणि निदानात अचूकता सुधारते. डॉक्टरांवरील ताण कमी होऊन उपचार प्रक्रिया अधिक सातत्यपूर्ण व कार्यक्षम बनते.
या एआय रुग्णालयाने अवघ्या काही दिवसांत १० हजारांहून अधिक आभासी रुग्णांवर उपचार केल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, दर आठवड्याला सरासरी १०० रुग्णांवर उपचार केले तर मानवी डॉक्टरांना एवढे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागली असती. श्वसनविषयक गंभीर आजारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘मेडवयूए’ डेटासेटवर या एआय डॉक्टरांनी ९३.०६ टक्के अचूकता नोंदवली आहे.
या प्रकल्पाचे मुख्य संशोधक लियू यान यांनी याला आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल असे संबोधले आहे. त्यांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे निदानातील चुका कमी होतील, उपचारात सातत्य येईल आणि वैद्यकीय व्यावसायिकांवरील कामाचा ताण लक्षणीयरीत्या घटेल.
सध्या संशोधक पथक राष्ट्रीय वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यावर भर देत असून, एआय आणि मानवी डॉक्टर यांचे समन्वयित कामकाज कसे अधिक प्रभावी होऊ शकते, यावर अभ्यास सुरू आहे. लवकरच हे रुग्णालय प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज होण्याची शक्यता असून, भविष्यात एआय हे आरोग्य पायाभूत सुविधांचा अविभाज्य भाग बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



