
मुंबई-वृत्तसेवा | रमजानच्या पवित्र महिन्यात ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबिया येथे गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे भाविक तेथे अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्याचे सांगितले आहे.

हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची अधिकृत नोंद सरकारकडे उपलब्ध असते; मात्र उमरासाठी अशी कोणतीही केंद्रीकृत व्यवस्था नाही. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्समार्फत प्रवास करतात. यंदा राज्यातील सुमारे ५०० हून अधिक ऑपरेटर्सनी भाविकांना उमरासाठी पाठवले असून, त्यापैकी केवळ मुंबईतूनच १०० हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय असल्याची माहिती आहे. त्यामुळे अडकलेल्या भाविकांचा नेमका आकडा पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल, असे प्यारे खान यांनी सांगितले. उमरासाठी गेलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील भाविकांचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द झाल्यास किंवा मुक्काम वाढल्यास या यात्रेकरूंना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागू शकते.
या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाशी समन्वय साधून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणी राज्य सरकारही सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारमार्फत विशेष मदत मिळवण्याची विनंती केली जाणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.राज्यातील विविध जिल्हे आणि गावांमधून उमरासाठी गेलेल्या हजारो भाविकांमुळे ही घटना अनेक कुटुंबांसाठी चिंतेची ठरत आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे केलेल्या हवाई कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
इराणच्या अधिकृत ‘तसनीम’ आणि ‘फार्स’ या वृत्तसंस्थांनी या घटनेला दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण आखात क्षेत्रात तणाव वाढला असून त्याचा परिणाम उमरासाठी गेलेल्या भारतीय भाविकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



