Home क्राईम यावल-टाकरखेडा मार्गावर भीषण अपघात :  १० ते १२ विद्यार्थी जखमी ; दोघांची...

यावल-टाकरखेडा मार्गावर भीषण अपघात :  १० ते १२ विद्यार्थी जखमी ; दोघांची प्रकृती गंभीर


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल बसस्थानकावरून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ईकॉ कारला जोरदार धडक दिल्याने आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात कारचालकासह सुमारे १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बसचे वाहक एस. एम. पाटील व चालक ए. ए. तडवी हे होते. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एसटी बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, भालशिव पिंप्रीकडून यावलच्या एका खासगी शाळेकडे विद्यार्थी घेऊन जाणारी एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची ईकॉ कार समोर आली. या वेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की ईकॉ कारमधील चालक व विद्यार्थी जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय पथक त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातातील विद्यार्थी वाहतूक करणारी ईकॉ कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून, अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी यावल ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात भेट देऊन अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


Protected Content

Play sound