भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील आमडदे येथील एका महिलेचे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना भडगाव बसस्थानकात घडलील आहे. याबाबत गुरूवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आमडदे गावातील रहिवाशी असलेल्या महिला रोहिणी विजय पाटील (वय ४७) ह्या गुरूवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भडगाव बसस्थानकावर उभ्या होत्या. पाचोरा ते पारोळा या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने रोहिणी पाटील यांच्या गळ्यातील ४ ते ५ ग्रॅम वजनाची आणि साधारण २० हजार रूपये किंमतीची सोन्याची ‘मनी मंगळसूत्र पोत’ अत्यंत चालाखीने चोरून नेली. याप्रकरणी महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रदीप चौधरी हे करीत आहे.




