जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जुन्या बस स्थानक परिसरातून एका दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने ८ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारे प्रेम महारु जाधव (वय ३५) हे एका खाजगी ठिकाणी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रेम जाधव हे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीके ८१७६) ने जुन्या बस स्थानक परिसरातील संघवी पाईपच्या बाजूला असलेल्या एका पंचरच्या दुकानावर गेले होते.

जाधव यांनी प्लास्टिकच्या पिशवीत १० लाख रुपये ठेवले होते, ती पिशवी त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. ते पंचर काढण्याच्या कामात व्यस्त असताना, कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने डिक्की उघडून त्यातील १० लाखांपैकी ८ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यावर जाधव यांना मोठा धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात धावपळ उडाली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम पोलीसांनी हाती घेतले आहे. लवकरच चोरटा हा पोलीसांच्या जाळ्यात असणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहे.



