जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गॅस सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयतर्फे २४ फेब्रुवारी रोजी भव्य गॅस सुरक्षितता अभियान राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे या उपक्रमात सहभाग नोंदवत नागरिकांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले.
महाविद्यालयाने यावर्षी ज्वलंत सामाजिक विषय म्हणून ‘गॅस सुरक्षितता’ या विषयाची निवड केली. घरगुती गॅसचा वाढता वापर, त्यातून उद्भवणारे अपघात आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर जनजागृतीची गरज अधोरेखित करण्यात आली. खेडी परिसर ते कालिंका माता परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधले. या दरम्यान सुमारे दहा हजार माहितीपत्रकांचे वाटप करून गॅस वापरताना घ्यावयाच्या काळजी, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना आणि अग्निसुरक्षेचे मूलभूत नियम यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

या रॅलीस प्रमुख पाहुणे म्हणून अश्वजीत घारडे, प्रभारी मुख्य अग्निशामन अधिकारी, जळगाव महानगरपालिका यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारत बारी, प्रभारी अग्निशामन केंद्र अधिकारी, जळगाव शहर महानगरपालिका, परिसरातील नगरसेवक प्रविण भाऊ कोल्हे आणि महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संबोधित केले. त्यांनी गॅस गळती ओळखण्याचे उपाय, सिलिंडर हाताळताना घ्यावयाची दक्षता आणि तातडीने अग्निशामन विभागाशी संपर्क साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमास सुमारे दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत नागरिकांशी थेट संवाद साधत सुरक्षिततेचे संदेश दिले. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी अंतर्गत राबविण्यात आला असून नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्रा. चंद्रकांत डोंगरे यांनी केले असून शिक्षकवृंदाचेही सहकार्य लाभले.



