मुंबई-वृत्तसेवा | मुंबई महापालिकेने सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला आहे. यामध्ये ८९.८४ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम दाखवण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या ७४,४२७.४१ कोटी रुपयांच्या तुलनेत ८.७७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. अर्थसंकल्पात विकासकामांवर विशेष भर देताना प्रशासकीय खर्चात कपात करण्याचे धोरण राबवले जाणार आहे. महापालिकेकडे एकूण ८९,४४९.३२ कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्यापैकी ४४,८२६.२३ कोटी रुपये राखीव आहेत. उर्वरित ३६,६२३.०९ कोटी रुपयांचा वापर आगामी विकास प्रकल्पांसाठी केला जाईल.
नवीन नियमांनुसार ४० बाय ४० फुटांपेक्षा मोठ्या जाहिरात फलकांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पदपथ आणि इमारतीच्या गच्चीवरही फलक लावण्यास मनाई असेल. यामुळे अनधिकृत आणि धोकादायक फलकांमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी होईल.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत आता मधुमेह आणि नेत्ररोगासाठी एआय तंत्रज्ञानाद्वारे मोफत उपचार उपलब्ध असतील. आरोग्य खात्यासाठी ५,२३७ कोटी रुपये तर पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी १५९.८२ कोटी रुपये राखीव आहेत.
बेस्टसाठी १००० कोटी रुपये, शिक्षण विभागासाठी ४,२४८.८ कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी ५८०.८२ कोटी रुपये, पर्जन्य जलवाहिनी विभागासाठी १,८०० कोटी रुपये, कोस्टल रोड प्रकल्पासाठी ९५० कोटी रुपये, रस्ते आणि वाहतूक विभागासाठी ६,८७५ कोटी रुपये, पूल विभागासाठी ९,६५० कोटी रुपये, आरोग्य विभागासाठी २,२१९.७१ कोटी रुपये, जल अभियंता विभागासाठी १,३३० कोटी रुपये, पाणी पुरवठा प्रकल्प खात्यासाठी ६,४७५ कोटी रुपये, मलनि:सारण प्रचालन विभागासाठी ७०० कोटी रुपये, मलनि:सारण प्रकल्प खात्यासाठी ९६० कोटी रुपये, मलनि:सारण प्रकल्प कामांसाठी ६,६०० कोटी रुपये आणि उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी ८०० कोटी रुपये राखीव आहेत. या अर्थसंकल्पातून मुंबईत विकास आणि सामाजिक कल्याणावर विशेष भर दिला जात आहे.



