रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात जिल्हास्तरीय भरारी पथकाने आज दुपारी अचानक कारवाई करत गुजरातमधील राजकोट येथून विक्रीसाठी आणण्यात आलेल्या विना परवाना आणि निकृष्ट दर्जाच्या बनावट विद्राव्य रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण 28 गोण्या एनपीके खतांचा साठा हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणाची सुरुवात रावेर येथील शेतकरी उदयभान पाटील यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली. बाजारात बनावट विद्राव्य खतांची विक्री होत असल्याची माहिती त्यांनी कृषी विभागाला दिली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रक भरारी पथकाने तत्काळ तपास मोहीम हाती घेतली. त्यानुसार दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास रावेरमधील छोरिया मार्केट परिसरात छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान गुजरातमधील Rajkot येथून आलेल्या ट्रकमध्ये संशयास्पद खतांचा साठा आढळून आला. भरारी पथकाचे प्रमुख पद्मानाभ म्हस्के (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव), जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास बोरसे, तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ललित इंगळे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोण्यांची तपासणी केली असता त्या विना परवाना व निकृष्ट दर्जाच्या असल्याचे स्पष्ट झाले.
एकूण 28 गोण्या विद्राव्य एनपीके खतांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित ट्रकसह हा मुद्देमाल पोलिस ठाण्यात ताब्यात देण्यात आला आहे. यापूर्वी याच खतांच्या पाच विविध ग्रेडचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्राप्त अहवालानुसार हे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे ही कारवाई अधिक बळकट झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
भरारी पथकाने जप्त खतांचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत खरेदी करताना परवाना, कंपनीची माहिती व बिलाची खात्री करूनच व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे.



