मुंबई-वृत्तसेवा | राज्यभर धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मधील सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी उमटली आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळत शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याने कर्मचाऱ्यांचा नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याचा वेतनवाढीचा थकीत हप्ता २४ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून शासनाच्या संवेदनशीलतेचे आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
मात्र, फेब्रुवारी महिन्यात काही तांत्रिक अडचणी आणि निधीअभावी हप्ता देण्यास विलंब झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यापैकी १०० कोटी रुपये तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले असून उर्वरित निधीही लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने एकूण ३२५ कोटी रुपयांची मागणी केली होती. शासन निर्णयानुसार मिळालेल्या निधीमुळे राज्यातील ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचे थकीत हप्ते जमा झाले आहेत.
थकीत वेतन खात्यात जमा होताच कर्मचाऱ्यांमधील नाराजी दूर झाली असून “दिलेला शब्द पाळला,” अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्य शासनाचे आभार मानले.



