Home आरोग्य दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे हाल; महापौर-उपमहापौरांचा कडक निर्णय

दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे हाल; महापौर-उपमहापौरांचा कडक निर्णय


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शैक्षणिक परिसरात सुरू असलेल्या कचरा हस्तांतरणामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या गंभीर समस्येची महापौर आणि उपमहापौरांनी तातडीने दखल घेत कचरा हस्तांतरणाचे काम त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव परिसर, महिलांचे वसतिगृह आणि शेजारील महाविद्यालय तसेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव समोरील भागात लहान कचरा गाड्यांमधील कचरा मोठ्या गाड्यांमध्ये भरला जात होता. हे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरणही बाधित होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या.

या गंभीर प्रकाराची दखल घेत महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावून स्पष्टीकरण मागितले.

महापौर आणि उपमहापौरांनी कॉलेज परिसरात सुरू असलेले कचरा हस्तांतरणाचे काम त्वरित बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच हे काम शहरातील अन्य योग्य आणि नियोजित ठिकाणी हलविण्याचे आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम इशारा देत नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. महापौरांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याची सूचना दिली.

 


Protected Content

Play sound