मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) टप्पा-२ च्या अंमलबजावणीला अखेर गती मिळाली असून, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार एकनाथराव खडसे यांना मोठे यश मिळाले आहे. घोषणा होऊनही रखडलेल्या या प्रकल्पाबाबत त्यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे.
९ डिसेंबर २०२५ रोजी विधान परिषद सभागृहात विशेष उल्लेख सूचना क्र. २३ द्वारे आमदार खडसे यांनी पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लेखी पत्राद्वारे माहिती देताना स्पष्ट केले की, राज्यातील २१ जिल्ह्यांतील ७२०१ गावांमध्ये या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार असून, पारदर्शकता आणि वेग यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १२५७ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ८९९ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून ७९२ उमेदवार प्रत्यक्ष कामावर रुजू झाले आहेत. उर्वरित रिक्त पदांचा कार्यभार अतिरिक्त जबाबदारीद्वारे सांभाळला जात आहे.
आमदार खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्तरावर ‘ग्राम कृषी विकास समिती’चे गठन पूर्ण झाले आहे. समूह सहाय्यक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प जळगाव जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.



