पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन खिसा कापणाऱ्या एका महिला टोळीला पाचोरा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या रकमेसह एकूण ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी वडगाव खुर्द येथील ७० वर्षीय वृद्ध शेतकरी श्रावण ताराचंद पाटील हे पाचोरा बसस्थानकावरून बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १३ हजार ४०० रुपये लंपास केले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई:
२३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील आणि श्रीराम शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरात तीन महिला संशयास्पदरीत्या फिरत असून त्या प्रवाशांची टेहळणी करत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने सापळा रचून निर्मला सुनील जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, जामनेर), सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. हिसोडा, भोकरदन) आणि उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, रा. कुंभारी, जामनेर) या तिघींना ताब्यात घेतले.
३२ हजारांचा मुद्देमाल जप्त:
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदारांनी या संशयितांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चोरीची रक्कम मिळून आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून अनुक्रमे १३ हजार ५०० रुपये, ६ हजार ६०० रुपये आणि १२ हजार ३०० रुपये असा एकूण ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.



