Home आरोग्य गोदावरी अभियांत्रिकीत भव्य रक्तदान शिबिर ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोदावरी अभियांत्रिकीत भव्य रक्तदान शिबिर ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व Dr. Ulhas Patil यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी स्वतः डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. अनिल पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पंकज शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रवीण फालक, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव यांच्यासह गोदावरी फाउंडेशनअंतर्गत सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दाखवून दिली. वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ औपचारिक कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची परंपरा गोदावरी फाउंडेशनने जपली असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत अनेकांनी प्रथमच रक्तदान करून इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.

डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना समाजाभिमुख विचार जोपासण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदानासारख्या उपक्रमातून समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालय प्रशासन व स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. रक्तदात्यांसाठी वैद्यकीय तपासणी, नोंदणी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शिबिरात लक्षणीय प्रमाणात रक्तसंकलन झाले असून ते विविध रुग्णालयांतील गरजू रुग्णांसाठी उपयोगी पडणार आहे.


Protected Content

Play sound