जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगाव येथे यशस्वीरीत्या पार पडला. ‘मेरा युवा भारत’ जळगाव तर्फे आयोजित या पाच दिवसीय उपक्रमात मुंबई जिल्ह्यातील ३७ युवक-युवतींनी सहभाग घेतला. राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक समन्वय आणि नेतृत्वगुणांचा विकास हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे हा कार्यक्रम पार पडला. विविध सत्रांद्वारे खानदेशचा समृद्ध इतिहास, अहिराणी भाषेचे महत्त्व, स्थानिक खाद्यसंस्कृती, ताण-तणाव व्यवस्थापन, अमली पदार्थांविषयी जनजागृती तसेच ‘विकसित भारत २०४७’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेवर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी युवकांशी संवाद साधत त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.

कार्यक्रमात सहभागी युवकांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी विविध शैक्षणिक भेटींचे आयोजन करण्यात आले. सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेंजेस येथे उद्योजकता व संशोधनविषयक माहिती देण्यात आली. तसेच Ajanta Caves येथे भेट देत भारतीय वारसा आणि प्राचीन कला-संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. आश्रमशाळा, ग्रामपंचायत तसेच कृषी विज्ञान केंद्र, पाल येथेही युवकांनी भेट देऊन ग्रामीण विकास, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील कार्यपद्धती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती रॅलीतही युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
समारोप कार्यक्रमात सहभागी युवकांनी जळगाव जिल्ह्याच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी क्षेत्र, खाद्यसंस्कृती आणि लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने आपले दृष्टीकोन व्यापक झाल्याचे त्यांनी नमूद केले. समारोपप्रसंगी व्ही. एम. रोकडे, संचालक, एनएसएस यांनी युवकांना पर्यावरण संवर्धनासह सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे महत्त्व पटवून दिले. जयदीप पाटील यांनी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करताना राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका अधोरेखित केली. अभिषेक चवरे, जिल्हा युवा अधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास राजू गावरे, जिल्हा समन्वयक, एनएसएस, श्री. के. दांडे, श्री. पी. चव्हाण, एनएसएस कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. स्वयंसेवक कमलेश सोनवणे, चेतन पाटील, तुषार साळवे आणि मुकेश भालेराव यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले. पाच दिवसांच्या या उपक्रमातून युवकांमध्ये “एकता व विविधता” ही भावना अधिक दृढ झाली असून राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव अधिक बळकट झाली आहे.



