एरंडोल/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशात सर्वत्र ‘डिजिटल इंडिया’चा गाजावाजा होत असताना, एरंडोल येथील एका २३ वर्षीय तरुणाला मात्र गेल्या सात वर्षांपासून एका आधारकार्डसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. बायोमेट्रिक ‘मिसमॅच’च्या तांत्रिक कारणामुळे वेदांत ओतारी या विद्यार्थ्याला अद्याप आधारकार्ड मिळालेले नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे या तरुणाचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून, संतप्त पालकांनी आता प्रशासकीय मुजोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
असे आहे हे प्रकरण :
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत ओतारी हा तरुण सध्या डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. लहानपणी शाळेत आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याचे बायोमेट्रिक तपशील (ठसे) जुळले नाहीत (मिसमॅच झाले). तेव्हापासून आजपर्यंत वेदांतचे आधारकार्ड बनू शकलेले नाही. यासाठी वेदांत आणि त्याचे वडील प्रल्हाद ओतारी यांनी गेल्या सात वर्षांपासून तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित आधार केंद्रांवर शेकडो फेऱ्या मारल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना तांत्रिक कारणांचे नाव सांगून रिकाम्या हाती परत पाठवले जात आहे.

शैक्षणिक स्वप्नांचा चक्काचूर :
आधारकार्ड नसल्याचा फटका वेदांतच्या करिअरला बसला आहे. आधारकार्ड नसल्यामुळे त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घेता आला नाही, परिणामी त्याला नाईलाजाने डिप्लोमा करावा लागला. इतकेच नव्हे तर, शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ त्याला घेता येत नाही. आधारअभावी मिळणाऱ्या अडचणींमुळे त्याचे शैक्षणिक वर्ष आणि आर्थिक सवलती वाया जात आहेत.
पालकांचा संताप आणि प्रशासनावर ताशेरे :
वेदांतचे वडील प्रल्हाद ओतारी यांनी प्रशासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सामान्य जनतेच्या कामासाठी अधिकारी मुजोर झाले आहेत. माझ्या मुलाच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? जर एखाद्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत असे घडले असते, तर तातडीने मार्ग निघाला असता. पण गरिबांच्या मुलाला जाणूनबुजून त्रास दिला जात आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. अधिकारी केवळ एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठवून वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन लक्ष देऊन वेदांतला आधारकार्ड मिळवून देणार की त्याची ही पायपीट अशीच सुरू राहणार, असा प्रश्न नागरीकांकडून केला जात आहे.



