Home राज्य नागपुरात बारावी पेपरफुटी प्रकरणात कोचिंग क्लास चालक आणि विद्यार्थ्याला अटक 

नागपुरात बारावी पेपरफुटी प्रकरणात कोचिंग क्लास चालक आणि विद्यार्थ्याला अटक 


नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । नागपूर शहरात बारावीच्या बोर्ड परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडवली असून पोलिसांनी मोठी कारवाई करत कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर फिरत असल्याचे उघड झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निशिकांत मूल (वय ४५, मानकापूर) असे अटक करण्यात आलेल्या ट्युशन क्लास चालकाचे नाव असून फरहान अख्तर असे विद्यार्थ्याचे नाव आहे. नागपूर शहरातील सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाला एका विद्यार्थिनीच्या वारंवार प्रसाधनगृहात जाण्याचा संशय आला. तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळून आला. मोबाईलची तपासणी केली असता सकाळी १०.३७ वाजताच, म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच, प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत उत्तरांचा संच एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

‘XII’ नावाच्या २१ सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर निशिकांत मूल यांच्या क्रमांकावरून पेपर पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. बारावी विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र (१६ फेब्रुवारी) आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचे पेपर परीक्षेच्या सुमारे तासाभरापूर्वीच सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी होणाऱ्या रसायनशास्त्राच्या पेपरआधीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर उपलब्ध होती. या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेची गोपनीयता भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रकरण उघड होताच संबंधित मोबाईल क्रमांक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फरहान अख्तर याच्यावर ग्रुपवर उत्तरं टाकल्याचा आरोप असून या दोघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकारामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून लीक झाली, ती कोणाकडून बाहेर आली आणि आणखी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली याचा सखोल तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound