मुंबई-वृत्तसेवा | सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि मेळघाटच्या दुर्गम दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आता विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे. राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने जारी केलेल्या पत्रकानुसार, आजवर केवळ पायवाटांनी जोडलेल्या अनेक दुर्गम पाड्यांपर्यंत आता ‘लालपरी’ची सेवा सुरू होणार आहे. सह्याद्री आणि मेळघाटच्या कुशीत असलेल्या या भागांमध्ये मोठ्या बसेस पोहोचू शकत नसल्यामुळे आदिवासी समाजाला शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत होती. मात्र आता ही परिस्थिती बदलणार असून एसटीची चाके थेट पाड्यांपर्यंत पोहोचणार आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाने 9 मीटर लांबीच्या आणि 35 आसनी अशा 100 अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंद, वळणावळणाच्या आणि घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील अशा या बसेसना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे. विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागांसाठी या बसेस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत एसटी सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून आज सुमारे 93 टक्के लोकसंख्या एसटीशी जोडली गेली आहे. तरीही अनेक आदिवासी पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले होते. आता या नव्या निर्णयामुळे त्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, रुग्णांना उपचारासाठी आणि युवकांना रोजगारासाठी प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.
हा उपक्रम केवळ वाहतुकीची सुविधा नसून सामाजिक समावेशकतेचा सेतू ठरणार आहे. दुर्गम भागातील आदिवासी समाज एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल आणि विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, लवकरच डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजासोबत विकास, समता आणि संधीची नवी पहाट उगवेल.