जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील फुफणी येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात घुसून अश्लील कृत्य करणाऱ्या आणि विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपीविरुद्ध शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील फुफणी गावातील एका भागात महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री महिला आणि त्यांचा मुलगा रात्री जेवण करून झोपले होते. घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याने संशयित आरोपी राजमल संतोष सपकाळे (रा. फुफणी, ता. जि. जळगाव) हा मध्यरात्री घरात शिरला. पीडित महिला झोपेत असताना आरोपीने त्यांच्या खाटेवर बसून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. शरीराला स्पर्श झाल्याचे जाणवताच पीडित महिलेला जाग आली आणि त्या घाबरून ओरडू लागल्या.

महिलेने आरडाओरडा केल्याचा राग आल्याने आरोपी राजमल याने त्यांचे केस ओढून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आईचा आवाज ऐकून झोपलेला मुलगा मदतीला धावून आला. यावेळी आरोपीने केवळ महिलेचा विनयभंगच केला नाही, तर फिर्यादी महिला आणि त्यांच्या मुलाला अश्लील शिवीगाळ केली. “तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडीत महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



