पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने भरदिवसा एका तरुणीचा गळा दाबून आणि डोक्यात दगडाने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना पहूर परिसरात शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित नराधमाला पोलीसानी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी पीडित तरुणी ही बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी श्रीकृष्ण देवचंद जाधव (रा. चारतांडा, ता. सोयगाव) याने पीडितेला बोलण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने आपल्या मोटारसायकलवर बसवून पहूर ते हिवरखेडा रोडवरील एका केळीच्या बागेत नेले.

तिथे नेल्यानंतर आरोपीने “तू माझ्यासोबत पळून चल, आपण लग्न करू” असा तगादा लावला. मात्र, पीडितेने याला स्पष्ट नकार दिला. या नकार दिल्याच्या रागातून संशयित आरोपीने “तू माझी झाली नाहीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही” असे ओरडत पीडितेचा गळा आवळला. इतक्यावरच न थांबता, त्याने तिला जातीयवाचक शिवीगाळ करत हातातील दगडाने तिच्या डोक्यात वारंवार प्रहार करून तिला गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयित आरोपी श्रीकृष्ण जाधव याला अटक केली आहे.



