Home आरोग्य जळगावात भव्य राज्यस्तरीय योग संमेलनाचे आयोजन

जळगावात भव्य राज्यस्तरीय योग संमेलनाचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वस्थ समाज आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीचा ध्यास घेत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघ (जळगाव जिल्हा समिती)तर्फे येत्या शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी जळगावात भव्य राज्यस्तरीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मायादेवी नगर येथील रोटरी हॉलमध्ये होणाऱ्या या एकदिवसीय संमेलनात यंदा ‘अल्टरनेटिव्ह थेरेपी’ अर्थात पर्यायी उपचार पद्धतींवर विशेष भर देण्यात येणार आहे. योगशिक्षक आणि योगसाधकांसाठी हे संमेलन ज्ञान, अनुभव आणि नव्या संकल्पनांची मेजवानी ठरणार आहे.

महाराष्ट्र योगशिक्षक संघ या संघटनेच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या हस्ते होणार आहे. राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि प्रा. कृणाल महाजन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख सुनील गुरव असतील, तर जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभणार आहे. राज्यभरातील योगशिक्षकांना एकत्र आणण्याचा आणि आधुनिक उपचार पद्धतींचे ज्ञान देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

योगासोबतच पूरक उपचार पद्धतींचे महत्त्व लक्षात घेऊन विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. राजेश जैन ‘ब्रेन सायन्स ऑफ अष्टांग योग’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, नेहा भोसले ‘बाराक्षार चिकित्सा पद्धती’ विषयी माहिती देणार आहेत. मुजीर पिंजारी ‘युनानी चिकित्सा पद्धती’वर भाष्य करतील, तर डॉ. माधवी वेद ‘प्राणिक हिलिंग’ या विषयावर सविस्तर विवेचन करतील. याशिवाय डॉ. नीलम अग्रवाल ‘योगमुद्रा’, डॉ. पूजा महाजन ‘कायरोथेरेपी’ आणि डॉ. कुलदीप पाटीदार ‘न्युरोथेरेपी’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. विविध तज्ज्ञांच्या सहभागामुळे संमेलनात योग आणि पर्यायी उपचारांचा समन्वय साधला जाणार आहे.

गेल्या पाच वर्षांत संघटनेने राज्यभर मोठा विस्तार केला असून सध्या आठ हजारांहून अधिक योगशिक्षक या परिवाराशी जोडले गेले आहेत. जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील योगशिक्षक व योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या माध्यमातून योगक्षेत्रातील नव्या प्रवाहांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या संमेलनाचा लाभ जास्तीत जास्त योगप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन संघाचे महासचिव पांडुरंग सोनार, कोषाध्यक्ष नूतन जोशी आणि मीडिया प्रमुख रोहन चौधरी यांनी केले आहे. योग आणि पर्यायी उपचार पद्धतींच्या संगमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.


Protected Content

Play sound