जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठलनगर, बाजारपेठ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे वादळामुळे मोठे नुकसान झाल्याने संतप्त नागरिकांनी स्मारकाची तातडीने पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापौर दीपमाला काळे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले.
दिनांक ११ जून २०२५ रोजी रात्री शहरात आलेल्या जोरदार वादळ-वाऱ्यामुळे या स्मारकावरील पत्र्याचे शेड पूर्णपणे उडून गेले होते. त्यामुळे स्मारक उघड्यावर आले असून पावसाळा व इतर नैसर्गिक घटकांमुळे पुतळ्याचे अधिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच असुरक्षित स्थितीमुळे भविष्यात महामानवांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका देखील व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केवळ तात्पुरती दुरुस्ती करून प्रश्न न सोडवता, मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचे आरसीसी बांधकाम करून स्मारकाची नव्याने उभारणी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली.

यासंदर्भात नागरिकांनी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. स्मारक हे केवळ एक बांधकाम नसून ते सामाजिक प्रेरणेचे आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक असल्याने त्याचे संरक्षण करणे ही प्रशासनाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्मारकाची योग्य देखभाल आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देताना माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, फुले-शाहू-आंबेडकर महापुरुष सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश झिने, विद्या झनके, शोभा इंगळे, प्रमिला इंगळे, चंद्रमणी सोनवणे, पूजा इंगळे, कांताबाई झिने, शोभा पाटोळे, प्रशांत इंगळे, आकाश तायडे, आकाश सपकाळे, छाया इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत स्मारकाच्या पुनर्बांधणीबाबत लवकरच योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.



